नाशिक -चांदवड शहरातील खासगी कोविड सेंटरच्या इमारतीला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून, रुग्णांना तातडीने चांदवड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आग लागल्याचे समजताच कोविड सेंटरमधील रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
नाशिकच्या चांदवड शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील लाकडी फर्निचरच्या मॉलला अचानकपणे आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. चांदवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, काही दिवसांपूर्वी या मॉलच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर आत्माराम कुंभार्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. या सेंटरचे मंगळवारी खा.भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच कोविड सेंटरच्या इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या लाकडी फर्निचरच्या मॉलला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रुद्ररूप धारण केले. आगीचे लोळ कोविड सेंटरपर्यंत पोहोचत होते. परंतु अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या 15 रुग्णांना सुखरूप इमारतीमधून बाहेर काढण्यात आले आहे. दोन तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.