नाशिक - शहरातील काही तरुणांना जॉब पोर्टलवर आपला बायोडेटा पाठवणे चांगलेच महागात पडले आहे. बड्या कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी या तरुणांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. भूषण काटे या तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
भूषणने एका जॉब पोर्टलवर आपला बायोडाटा टाकला होता. त्यानंतर त्याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपल्याला नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आहे, असे सांगून त्याने भूषणला संबंधित खात्यावर 2900 रुपये टाकण्यास सांगितले. मात्र, भूषणने पैसे न भरता तक्रार दाखल केल्याने त्याची फसवणूक टळली.
हेही वाचा - यवतमाळमध्ये क्रेडिट कार्डद्वारे २ लाखांचा गंडा; मुख्य सूत्रधार मध्य प्रदेशमधील
सध्या सर्वत्र मंदीचे सावट आहे. त्यामुळे तरुण जमेल त्या मार्गाने नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याच अपरिहार्यतेचा फायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. परदेशात किंवा नामांकीत कंपनीत नोकरी मिळाल्याचे या तरुणांना भासवले जाते. नंतर, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. याशिवाय, सायबर गुन्हेगारांनी बेरोजगार तरुणांना हेरून फोनद्वारे त्यांना नोकरचे आमिष दाखवून लुबाडल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत.