सोलापूर- काळ्या मातीत घाम ओतून देखील कष्टाची चीज होत नाही. म्हणून शेतकरी बाप निराश होतो. मात्र माढ्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने स्वत:च्या स्वप्नाची माती होऊ दिली नाही. माय-बापाच्या काबाडकष्टाशी इमान राखत मेहनत करून या शेतकरी पोरानं आयआयटी परीक्षेत भरारी मारली आणि तुषार कदम आयआयटी अभियंता झाला. मुलाच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे आई-वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
पहिल्याच प्रयत्नात यश
माढ्यातील तुषार विलास कदम याने आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण होत यशोशिखर गाठले आहे. शेतकरी कुटूंबातील तुषारने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. वडिल विलास आणि आई लता कदम हे दोघेही शेतात शेती करून कुटूंबाचा गाडा हाकतात. तुषारचे प्राथमिक शिक्षण माढ्यातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तुषारच्या शिक्षणासाठी त्यांनी मेहनत घेऊन ऊसनवारी करून शिक्षण पुर्ण केले. त्याचे फलित त्यांना आज मिळाले आहे. हे सांगताना आई-वडीलांच्या डोळ्यातील आनंदाश्रुंनी मोकळी वाट करुन दिली.