नाशिक - दिंडोरी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेले शेतकरी अद्यापही सरकारी मदतीपासून वंचित असल्याचे दिसत आहे. शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येणाऱ्या रक्कमेचे वाटप, दिंडोरी तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे होत नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मात्र, काही ठिकाणी अनेक बागायतदार शेतकऱ्यांना दोन वेळा अनुदान वाटप झाल्याने, कोणत्याही स्वरूपातील अनुदान न मिळालेल्या शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.
हेही वाचा... कडकनाथ घोटाळा : 'कुटुंबाच्या सहभागाचे पुरावे द्या, राजकारणातून संन्यास घेईन'
अवकाळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील 30,498 शेतकरी बाधित झाले. त्यापैकी 28,808 शेतकऱ्यांना 31 कोटी 4 लाख 22 हजार 971 रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. यात फळपीकास हेक्टरी 18 हजार तर इतर पिकांना हेक्टरी 8 हजार, असा साधारण वाटपाचा निकष होता. अनुदान वाटप दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांसाठी करण्यात आले. अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर तलाठ्यांनीच मोठ्या प्रमाणात अडवणूक केल्याचे शेतकरी सांगत आहेत.