नाशिक(मनमाड) -मागील आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आता कामाला लागला असून शेतीची मशागत आणि पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी पिक कर्ज मिळत नसल्याने उधार किंवा उसनवारी करून पेरणी करण्यात येत आहे. सरकारने त्वरित बँकांना आदेश देऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ग्रामीण भागात खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अगोदरच नांगरून ठेवलेल्या क्षेत्रात पेरणी सुरू करण्यात आली आहे तर काही ठिकाणी मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. कोरोनामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन मागील कसर काढण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, यासाठी लागणारे बियाणे आणि खत घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल नाही. यासाठी लागणारे पीककर्ज देण्यासाठी बँका देखील असमर्थता दाखवत असल्याने शेतकरी संकटात आला आहे. कोरोना लॉकडाऊननंतर बियाणांचे भाव देखील वाढले आहेत. खतांच्या किमतीतही सरकारी किंमतीपेक्षा 15 टक्के ते 20 टक्के वाढ झाली आहे.