येवला ( नाशिक)- येवल्यातील अंकाई किल्ला परिसरात सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे परिपक्व मुगाच्या शेंगा भिजून गेल्याने खराब झाल्या आहेत. हातचे पीक पावसामुळे वाया गेल्याने उभ्या पिकात जनावरे चरण्यास सोडून देण्याची वेळ येथील शेतकरी दयाराम भिडे यांच्यावर आली आहे.
येवल्यात संततधारेमुळे शेतकरी हतबल; मुगाच्या उभ्या पिकात जनावरे चरायला सोडण्याची वेळ
पावसाची संततधार लागून राहिली. त्यामुळे मुगाचे पीक खराब झाले. त्यामुळे अक्षरशः हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या उभ्या मुगाच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली.
येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्या समोरील शेतकरी दयाराम भिडे यांनी एक एकरात मुगाचे पीक घेतले होते. यंदा पाऊस चांगला झाल्यानं मुगाचे पीक चांगले आले होते. पिकास फळही चांगले आले होते. मात्र, नेमके मुगाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या कालखंडातच पावसाची संततधार लागून राहिली. त्यामुळे मुगाचे पीक खराब झाले. त्यामुळे अक्षरशः हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या उभ्या मुगाच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली.
सध्या मुगाला चांगल्याप्रकारे भाव आहे. मात्र, सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तसेच या शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप टाकलं होतं. मात्र, सततच्या पावसामुळे हे कांद्याचे रोप सुद्धा खराब झाल्याने या शेतकऱ्याला आता कांदा लागवडही करता येणार नाही. त्यामुळे पावसामुळे या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले आहे.