नाशिक- दिंडोरी तालुक्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 2 हजार 638 हेक्टर इतके आहे. दिंडोरी तालुक्यात बदलत्या हवामानामुळे उसाला तुरे फुटल्यामुळे उस उत्पादनाच्या वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.
बदलत्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या ऊस शेतकऱ्याला आता तुऱ्याच्या संकटानेही चिंताग्रस्त केले आहे. उसाला तुरे फुटल्याने उसाची प्रत खालावते. परिणामी त्याच्या वजनातही घट होते. वजनात घट झाली की शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होते. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला नाहक नुकसान सहन करावा लागत आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने उसाला एका टनाला 2 हजार 750 रुपये भाव नक्की केला आहे. तुरा निघाल्यामुळे दोन टन वजनाचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे ऊस उत्पादक सांगत असून त्वरित तालुक्यातील उसाची तोड सुरु करण्याची मागणी करत आहे .