देवळा (नाशिक) : लॉकडाऊनमुळे वाहतुकीला अडचण आणि पिकालाही योग्य भाव नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या रंगीत शिमला मिरचीवर रोटर फिरवण्याची वेळ देवळा येथील शेतकऱ्यावर आली. चिंतामण बळीराम आहेर या शेतकऱ्याचे या निर्णयामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देवळा येथील प्रगतीशील शेतकरी चिंतामण आहेर हे तसे अभियंता आहेत. मात्र, त्यांनी कारखान्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून नव्या प्रयोगासह शेती करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा...'देशात दररोज तयार होत आहेत तीन लाख पीपीई किट्स; होतायत ९५ हजार कोरोना चाचण्या..'
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुमारे २० लाखाचे कर्ज काढून आहेर यांनी २० गुंठे जागेवर पॉलीहाऊसची उभारणी केली होती. शेकडो किलोमीटरवरून लालमाती आणि इतर निविष्टा आणून त्यांचा वापर शेतीसाठी केला होता. पहिल्या वर्षी नामदारी जातीच्या रंगीत सिमला मिरचीची लागवड केली. त्यावर्षी आहेर यांना सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, त्यानंतर एकदोन वर्षे अवर्षण, दुष्काळामुळे फारसे उत्पन्न मिळाले नाही.
मागील वर्षी त्यांनी जैविक पद्धत आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून १५ टन पिवळ्या आणि लाल मिरचीचे उत्पन्न घेतले होते. त्यास प्रति किलोमागे १५ ते १६ रुपये खर्च वजा जाता साधारणता ३५ ते ४० रुपये किलो प्रमाणे नफा मिळाला होता. गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळाल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात त्यांनी महागडे बियाणे घेऊन मिरचीची लागवड केली होती. यावर्षी वातावरण पुरक असल्यामुळे सिमला मिरचीची वाढही चांगली झाली होती. बाहेर राज्यात आणि पंचताराकीत हॉटेल तसेच चायनिज फुड करीता या मिरचीस मागणी असते.
परंतु मागील ४० ते ४५ दिवसांपासुन राज्यात लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल व्यवसाय बंद झाले आहेक. त्यामुळे बेसुमार खर्च करून पिकवलेली आणि सद्यमितीस निर्यातक्षम असेलेली मिरची खराब होत आहे. पूर्वी ६० ते ७० रूपये किलोप्रमाणे जागेवरच विकली जाणारी मिरची, लॉकडाऊनमुळे फुकटही कोणी घेत नाही. त्यामुळे मिरची जनावरांना टाकण्याबरोबरच उकिरड्यावर फेकून द्यावी लागत आहे. त्यामुळे चिंतामण आहेर यांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे.