नाशिक- नापिकी,अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कवनाई येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जयवंत शिरसाट (वय 46) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा -अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटरसायकलस्वार ठार
अधिक माहिती अशी, की इगतपुरी तालुक्यातील कवनाई येथील जयवंत शिरसाट (वय 46) या शेतकऱ्याने घोटी येथील एका खासगी बँकेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते. शेतीसाठी ट्रॅक्टरही कर्जाने घेतला होता. अवकाळी पावसामुळे शिरसाट यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. याच कर्जबाजारीला कंटाळून जयवंत शिरसाट यांनी पहाटेच्या सुमारास गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिरसाट यांना विहिरीबाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे.