नाशिक - जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला असतो. कधी दुष्काळ, तर अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. मात्र, भार्डी येथील एका शेतकऱ्याने या दुष्काळावर मात करीत 'आल्या'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामधून त्यांना जवळपास ४ ते ५ लाख रुपयांचा नफा मिळण्याची आशा आहे.
देविदास मार्कंड, असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या परिसरात कायम दुष्काळी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. मात्र, या दुष्काळी परिस्थितीवर सरपंच देविदास यांनी आल्याचे शेती केली. त्यांनी जवळपास ५५ गुंठे शेतात मे महिन्यात 'माहीम' जातीच्या आल्याच्या वनाची लागवड केली. पूर्व मशागत करताना त्यांनी बेडवर १० ट्रॉली शेणखत व दोन टन कोंबडीखत टाकले. त्यामध्ये काही प्रमाणात पोटॅशिअमचा वापर केला. त्यांनी जवळपास ५५ गुंठ्यात हा प्रयोग केला. शेततळ्यातील पाण्याचा वापर करताना ठिबक सिंचन प्रणाली वापरली. करपा व बुरशी पडू नये म्हणून प्लांट व बेडची त्यांनी विशेष काळजी घेतली. त्याचा परिणाम आज हिरवा व मजबूत असे 'आले' शेतात बहरले आहे. साधारण दीडशे क्विंटल आल्याचे उत्पादन निघणारच, असा ठाम विश्वास देविदास मार्कंड यांना आहे.