नाशिक- येथील कुंदेवाडी मधील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. नवनाथ शिवाजी आहेर (वय३४) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा-मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नवनाथ यांच्यांकडे कुंदेवाडी येथे वडिलांच्या नावावर असलेल्या क्षेत्रात 3 एकर द्राक्ष बाग आहे. या द्राक्षबागेचे संगोपन नवनाथ आहेर करत होते. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने त्यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष लागवडीसाठी त्यानंतरच्या मशागतीसाठी त्यांनी मोठा खर्च केला. खर्च कसा फिटणार या विवंचनेत ते सतत होते. दरम्यान, रविवारी सकाळी 7 च्या सुमारास द्राक्षबागेत विषारी औषध त्यांनी घेतले. त्यांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील तरुण शेतकरी द्राक्ष शेती करतात. मात्र, सतत तीन-चार वर्षापासून आस्मानी, सुलतानी संकटामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. नवनाथ आहेर यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे. नवनाथ आहेर यांच्या मागे 2 मुले, पत्नी,आई, भाऊ असा परिवार आहे.