नाशिक - सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट केले. तरिही अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही. याचे पडसाद बाजारपेठेवर उमटत आहेत.
जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. शनिवारच्या तुलनेत कांद्याचा दर 500 रूपयांनी घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडण्याचा निर्यण घेतला.
लासलगाव, मनमाड, पिंपळगाव उमराणे ,सटाणा बाजार समितीमध्ये अर्धा तास लिलाव बंद होते. निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात केंद्र शासनाने तत्काळ अधिसूचना जारी करावी, अशी मगणी यावेळी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटनांतर्फे स्थानिक तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
कांद्याचे आजचे दर सरासरी 1400 कमीतकमी 900 तर जास्तीत जास्त 1600 असले, तरिही शनिवारच्या तुलनेत कांदा 500 रुपयांनी कमी झाला आहे. केंद्र सरकार याबाबतीत लवकरच निर्णय घेणार असून सर्व शेतकऱ्यांनी सयम ठेवावा, असे आवाहन लासलगाव समितीचे अध्यक्ष उषा शिंदे केले.