मनमाड (नाशिक) - कोरोनाचा देशभरात वाढता प्रभाव पाहता प्रत्येकजण आपल्या परीने देशावर आलेल्या संकटाशी टाळण्यासाठी मदत करत आहेत. पोलीस यंत्रणा असो वा प्रशासकीय यंत्रणा हे सर्वचजण लढताना दिसत आहेत. या लढ्यात मनमाडमध्ये काही माजी सैनिक सध्या मनमाड शहरातील या पोलीस व वैद्यकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. जवळपास 32 माजी सैनिक व 30 होमगार्ड सध्या स्वखुशीने व विनामोबदला ही सेवा बजावत असून या सर्वांचे मनमाड शहरातील जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अनेक सामाजिक संस्था मदत करत आहेत. यात मनमाड शहरातील माजी सैनिक यांच्या संघटनेने पोलीस व मनमाड नगर पालिका यांच्याकडे विचारपूस करुन स्वखुशीने व विनामोबदला सेवा देण्यासाठी विचारणा केली होती. दोन्ही यंत्रणेने होकार दिल्यानंतर या सर्व माजी सैनिकांनी आपले नियोजित काम आवरून वेळा ठरवून घेत शहरातील भाजी मंडई, बँक, सरकारी रुग्णालय तसेच शहरात येणाऱ्या सीमा याभागात कर्तव्य बजावत आहेत. ते 24 तास त्यांच्या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सेवा करत आहेत.