मुंबई - काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. आज (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. निर्मला गावित यांनी आपल्या कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला. माणिकराव गावित हे काँग्रेस मधले मोठे घराणे आहे. इंदिरा गांधींचा आणि गावित कुटुंबियांचे सौख्य होते.
निर्मला गावित पक्ष बांधणीसाठी पुढे काम करतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गावित यांच्या पक्ष प्रवेशावर बोलताना म्हटले. तसेच उध्दव ठाकरे म्हणाले, "उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे प्राबल्य आहे. मात्र, निर्मला गावित यांच्या येण्याने राहिलेली उणीव ही भरून निघेल. शिवसेनेच्या जागा किती येतील माहीत नाही, मी अंदाजही बांधत नाही पण जिंकायचे म्हणजे जिंकायचे"