दिंडोरी(नाशिक)-दिंडोरी तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने कडक पावले उचलावीत व सर्व सामान्यांप्रमाणे कपंन्यांवर गुन्हे दाखल का होत नाही, अशी चर्चा परिसरात सुरू असल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एक केमिकल कंपनी व नामांकीत पत्र्यांची कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट; लखमापूर एमआयडीसीतील दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल - लखमापूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची तक्रार
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनी आणि पत्रे बनवणारी कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लखमापूरचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. दोन्ही कंपन्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केमिकल कंपनीत १५० ते २०० कामगार आहेत. या कंपनीत उत्पादन सुरू केल्यानंतर कंपनीत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. कंपनीला सूचना केल्यानंतरही कंपनीच्या व्यवस्थापकाने कामगारांची व अधिकार्यांची सुरक्षितता जपली नाही. त्यामुळे कंपनीमध्ये १२ कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या कारणास्तव कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात लखमापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी तक्रार दिली आहे.
एका पत्र्याच्या कंपनीमध्येही कामगारांना लागण झाली. या कंपनीत ३०० ते ३५० कामगार आहेत. परंतु, सर्वजण कामावर येत नाहीत. कंपनीचे उत्पादन सुरू असताना कंपनीत व्यवस्थापनाला कोविड आजाराबाबत काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापनाने खबरदारी घेतली नाही. प्रशासनाने स्वॅब घेतले असता सुमारे ४७ कामगार कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे लखमापूरचे ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी कंपनीचे व्यवस्थापक जब्बार नभिखाल पठाण व सहव्यवस्थापक विजेंद्र बाबू यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये व साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघनाप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
केमिकल व नामांकित पत्र्यांची कंपनी या दोन्ही कंपन्या तालुक्यातील मोठ्या कंपन्या असून या कंपन्यांनी वास्ताविक काळजी घ्यायला हवी होती.परंतु, पाहिजे तशी दक्षता न घेतल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला. लखमापूर औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांनीही आणि कामगारांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, परिसर निर्जंतूक करावा, असे आवाहन लखमापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.