नाशिक: पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरिया या आजारांनी डोके वर काढले आहे. यासोबत आता नव्याने काही दिवसांपासून डोळ्याची साथ मोठ्या प्रमाणात शहरात पसरत आहे. ही साथ शहरातील सातपूरसह अशोकनगर, सावरकर नगर, पपया नर्सरी, आनंद छाया या भागात सर्वाधिक आहे. या भागात डोळ्यांच्या साथीचे 500 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ते महानगरपालिका तसेच खासगी रुग्णालयात औषधोपचार करत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा सल्ला महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे. संसर्ग झाल्यास त्यावर कोणताही घरगुती उपचार न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
भाजी बाजार बंद:सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोळे दुखण्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजार पसरत असताना, आता डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. सातपूर परिसरात पाचशे रुग्ण आढळून आले असून याचा परिणाम येथील व्यवहारांवर होत आहे. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने भीतीपोटी काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. भाजी मार्केटमध्ये देखील ग्राहक फिरकत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.