नाशिक -धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वतावर दुर्मिळ आणि वन्यजीव औषधी आहेत. त्यामुळे या ठिकाणी पक्का रस्ता करण्याच्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. पर्यावरण प्रेमींच्या मागणीचा अभ्यास करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
अंजनेरीच्या विकासकामांना मिळालेल्या स्थगितीचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले पर्यावरण प्रेमींचा आहे विरोध -
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या अंजनेरी येथील विकास कामांच्या प्रस्तावाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे नाशिक शहरासह राज्यभरातील हजारो पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. श्रीरामाचे परमभक्त असलेल्या हनुमानाचे जन्मस्थळ असलेल्या नाशिकमधील अंजनेरी पर्वताला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. याठिकाणी दुर्मीळ वन्यजीव पुष्प आणि वनस्पती असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकास कामे करण्यात येऊ नये अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी गेल्या अनेक वर्षांपासून घेतलेली आहे.
पर्यावरण मंत्र्यांनी रस्त्याच्या कामाला दिली स्थगिती -
राखीव संवर्धन क्षेत्रातून अंजनेरी माथा ते मुळेगावपर्यंतचा चौदा किलोमीटरचा पक्का रस्ता बांधण्याचा प्रस्ताव शासन दरबारी ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर नाशिकमधील अनेक पर्यावरण संस्थांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्यांनी 'दर्शवत सेव अंजनेरी' ही मोहीम हाती घेतली होती. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे या ठिकाणच्या रस्त्याचा प्रस्ताव थांबवण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. या पत्रावर राज्यभरातून पाच हजार पेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या. आदित्य ठाकरे यांनी या मागणीचा अभ्यास करून रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली.