नाशिक - पश्चिम विधानसभा मतदार संघातून कामगार आणि उद्योजकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी नाशकातील उद्योजकांनी केली आहे. उद्योजक असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास नाशिकमधील उद्योजक आणि कामगार मिळून त्याला बहुमताने विजयी करु, असा दावा या उद्योजकांनी केला आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्योजक आणि कामगरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी, यासाठी नाशिकमधील उद्योजक एकत्र आले आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच मतदारसंघात नाशिकच्या अंबड आणि सातपूर या दोन प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, या मतदारसंघाच्या स्थापनेपासून एकही मोठा उद्योग आजवरच्या लोकप्रतिनिधींना आणता आलेला नाही. शिवाय कामगरांच्या निवृत्ती वेतनापासून ते स्वतंत्र अद्यायावत रुग्नालयाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत जो पक्ष उद्योग क्षेत्राची जाण असलेल्या उद्योजकाला उमेदवारी देईल, त्याच पक्षाच्या पाठीमागे उद्योजक आणि वसाहतीतील कामगार उभे राहतील, असा इशारा उद्योजकांनी दिला आहे.