नाशिक- राज्यात 80 हजार रिक्त पदांसाठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशात अनेकजण आर्थिक संकटात सापडल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न त्यांना पडला. टाळेबंदीमध्ये नोकरी गमावून बसलेले हजारो युवक आता नोकरीच्या शोधात आहेत. अशात महाराष्ट्र सरकारने रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्यात 80 हजार रिक्त पदांसाठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी दिली आहे. 431 मुले प्रत्यक्ष रुजू झाली
नाशिकमध्ये कोरोना काळात सर्वप्रथम ऑनलाइन रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या रोजगार मेळाव्याला नाशिक जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या 4151 रिक्त पदांसाठी 10 हजारहुन अधिक मुलांनी रोजगारासाठी ऑनलाइन अर्ज केले. यात 1255 मुलांनी प्रत्यक्षात ऑनलाइन मुलाखती दिल्या आणि 674 मुलांची निवड करण्यात येऊन 431 मुले प्रत्यक्ष रुजू झाली. तसेच राज्यात 80 हजार रिक्त पदांसाठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक संपत चाटे यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर गदा
कोरोना काळात करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे नाशिकचे अनेक उद्योग अडचणीत सापडले. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले तर अनेकांना वेतन कपातीची सामना करावा लागला. अनेकांवर आर्थिक संकट ओढवल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. अजूनही अनेक व्यवसाय पूर्णपणे सुरळीत सुरू न झाल्याने शहरातील अर्थचक्र रुळावर आले नाही.
स्थनिक युवकांना रोजगाराच्या संधी
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रीकल क्षेत्राशी निगडित शेकडो कंपन्या आहेत. मुंबई, पुणे नंतर नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे मोठं औद्योगिक क्षेत्र आहे. नाशिक शहराच्या अंबड, सातपूरसह जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी भागात एकूण 3500 हजार लहान मोठे उद्योग व्यवसाय आहेत. तसेच ह्या कंपन्यांमध्ये दीड ते दोन लाख कामगार काम करतात. ह्यातील बहुतांशी कामगार हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आदी राज्यातील आहे. लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग बंद असल्याने अनेक परप्रांतीय कामगार आपल्या गावी गेले होते. ह्यातील अनेक कामगार परतले असून शेकडो कामगार आजही परतले नसल्याने ह्यामुळे स्थानिक युवकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.