मनमाड (नाशिक) - अजून पावसाळा सुरू देखील झाला नाही, तोच महावितरणचा ढिसाळपणा चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. येथील रमाबाईनगर कॅम्प, भारतनगर, शांतीनगर आदी भागात रोज रात्री वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी महावितरणला फोन लावल्यास तिकडून प्रतिसाद मिळत नाही. वारंवार रिंग होऊन फोन बंद होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून महावितरणच्या कारभाराला नागरिक वैतागले आहेत.
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा रोष - मनमाड वीज पुरवठा
येथील रमाबाईनगर कॅम्प, भारतनगर, शांतीनगर आदी भागात रोज रात्री वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी महावितरणला विनंती केली आहे.

याबाबत महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी दखल घेत आम्हाला नियमितपणे व अखंडितपणे वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. मे महिन्याच्या मध्यात महावितरणच्या वतीने पावसाळापूर्व कामे करण्यासाठी नियमितपणे तीन दिवस दोन्ही भागातील वीजपुरवठा खंडित करून लाईन मेंटेनन्स, लाईनवरील झाड तोडणे, डीपीच्या सर्व्हिस करणे अशी कामे करण्यात आली. त्यानंतरही आता वीज पुरवठा खंडित होत आहे. महावितरण विभागाच्या 222384 या क्रमांकावर फोन लावला तर कोणी फोन स्वीकारत नाही, कधी घेतलाच तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
याबाबत उपअभियंता यांना तक्रार करून देखील आजपर्यंत त्यांनी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत कोणीही बोलण्यास तयार नसून यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. शहरातील राजकीय पक्ष व स्वयंघोषित पुढारी देखील याकडे लक्ष देण्याकडे तयार नसल्याने नागरिकांनी आता तक्रार कोणाकडे करायची, असा संतप्त प्रश्न केला आहे.