नाशिक : सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर शिंदे गटाने त्यांच्याकडे अर्थखाते देऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत अजित पवार यांना अर्थमंखाते द्यायचे नसेल तर अर्थखाते तुमच्याकडे ठेवा. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद द्या, असा प्रस्ताव ठेवल्याने शिंदे गट बॅकफूटवर आल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता शिंदे गटाला अजित पवारांची धुणीभांडी करावीच लागतील असा टोलाही राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
शिंदे गटाला धुणीभांडी करावीच लागेल : अजित पवार आमच्यासोबत नको, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे होते. आता त्यांना टाळ्या वाजवण्याशिवाय पर्याय नाही. शिंदे गटाला अजित पवार यांची धुणीभांडी करावी लागेल. यावेळी त्यांनी शिंदे गट, अजितदादा गटात जमीन अस्मानचा फरक आहे. अजितदादा गटातील नेत्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भोगले आहे. अजित दादांना अर्थमंत्री पदाचा अनुभव आहे. मात्र, अजित पवार यांचा निर्णय योग्य नाही. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राचे भले होणार नाही, असेही खासदार राऊत म्हणाले.