नाशिक- पेठ तालुक्यातील घोटविहिरा गावाच्या परिसरात भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. त्यामुळे उंमरमाळ पाड्याच्या १५ कुटुंबांना करंजपाडा या जवळच्या गावात स्थलांतर करण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घोटविहिरा परीसरात भूकंपाचे धक्के घोटविहिरा गावातील लोकांनी ही बाब लागलीच स्थानिक पोलीस व तहसीलदारांना कळवली. त्यानंतर तहसीलदार हरिष भामरे व हरसूल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घोटविहिरा गावाकडे धाव घेतली. गावातील ग्रामस्थांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे कळताच पोलिसांनी २ ते ३ कि.मी डोंगराच्या खाली असलेल्या उंमरमाळ मधील १५ घरांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले व गावकऱ्यांना धीर दिले.
घोटविहिरा गावातील जमीन तासातासाला खाली सरकत असल्याने या गावाचे माळीन होण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे इथले ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहे. या गावाच्या खालील भागात असलेल्या उंबरमाळ पाड्यावरील नागरिकांना जरी सुरक्षित स्थळी हालवण्यात आले असले तरी घोटविहिरा गाव अद्याप धोकादायक ठिकाणी आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय तोडगा काढणार याची गावकऱ्यांना प्रतिक्षा आहे.
पोलीस व ग्रामस्थांच्या उत्तम सहकार्यमुळे गावकऱ्यांना सुरक्षित ठिकानी हालविण्यात यश
घोटविहिरा गावातून या घटनेबाबत संपर्क झाल्यानंतर तात्काळ हरसूल पोलिसांनी रात्रीच गावाला भेट देऊन तेथील जनतेला दिलासा दिला. खबरदारीचा उपाय म्हणून उंबरमाळचे लोक स्थलांतरीत करण्यात आले. याकामी पोलीस निरीक्षक शिवाजी बढे, पोलीस पाटील यशवंत चौधरी यांचे सह ग्रामस्थांनी उत्तम सहकार्य केले. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच प्रशासनाच्या संपर्कात रहावे, असे पेठ तालुक्यातील तहसीलदार हरीष भामरे यांनी सागितले आहे.