नाशिक - जायखेडा येथील बालचित्रकार समर्थ शेवाळे याने आपल्या आईच्या मदतीने साकारलेल्या "उगारली असेल काठी,केवळ तुमच्या हितासाठी" या बोलक्या पेंटींगचे सध्या परिसरात कौतुक होत आहे. तसेच हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासही मदतीचे कार्य करत आहे.
'उगारली असेल काठी, केवळ तुमच्या हितासाठी', समर्थने दिला आपल्या बोलक्या चित्राच्या माध्यमातून संदेश
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी जरी काठी उगारली असली, तरी ती आपल्याच हितासाठी असल्याने त्याचा कोणीही राग द्वेष करु नये, असे बोलके चित्र समर्थ शेवाळे या बाल चित्रकाराने रेखाटले आहे.
इयत्ता दुसरीत शिकणारा समर्थ शेवाळे याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पेंटींगद्वारे बोलका संदेश देऊन जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी जरी काठी उगारली असली, तरी ती आपल्याच हितासाठी असल्याने त्याचा कोणीही राग द्वेष करु नये, असे बोलके चित्र या बाल चित्रकाराने रेखाटले आहे.
यात कोरोना विषाणूंशी लढणाऱ्या व मानवरुपी देव असलेले डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे सर्व स्वतःचा जीव धोक्यात घालून व रस्त्यावर उतरुन जनतेसाठी सेवा बजावत आहेत. कोरोना विषाणूंच्या फैलावास रोखण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या घरातच थांबून या सर्व माणूसरुपी देवदुतांना सहकार्य केले पाहिजे, असा संदेश त्याने आपल्या चित्रातून दिला आहे. या चित्राचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक होत आहे. या चित्राद्वारे गावागावात जास्तीतजास्त जनजागृती व्हावी, यासाठी सोशल मीडीयाच्या माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. समर्थ शेवाळे याचे चित्र खूप कमी शब्दात जनजागृतीस हातभार लावत आहे. या चित्रासाठी त्याला आई पूनम शेवाळे व वडील प्रकाश शेवाळे यांनी मदत केली आहे.