नाशिक- जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळमध्ये महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. या चळवळीत लढवय्या महिलांपैकी नाशिकच्या नाजाबाई नामदेव सोनवणे या एक आहेत. डॉ. बाबासाहेब नाशिकरोड येथील प्रेसच्या विश्रामगृहात दहा दिवस मुक्कानी होते आणि हे दिवस आमच्यासाठी मंतरलेले होते. बाबासाहेबांकडे रोज जेवण घेऊन जायचे. बाबासाहेबांना मासे आवडायचे म्हणून एक दिवस त्यांच्यासाठी बोंबलाची चटणी आणि भाकरी बनवली होती. त्यांना ती इतकी आवडली की ते सर्वांसमोर म्हणाले, "नाजा, तुझ्या हाताची बोंबलाची चटणी भारी गं", हे शब्द आजही माझ्या कानावर घुमते. डॉ बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या नाजा सोनवणे यांनी आंबेडकरी जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ बाबासाहेबांच्या अनेक आंदोलनात सहभाग -1950 पासून डॉ. आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या सामाजिक चळवळीत सक्रियता वाढली होती. 1954 साली झालेल्या नोट प्रेस मधील कामगारांच्या संपात डॉ बाबासाहेब यांच्या नेतृत्वाखाली नाजा सोनवणे यांनी सहभाग घेतला. 6 डिसेंबर 1956 रोजी नाजाबाई या डॉ आंबेडकर यांच्या अंत्यविधीसाठी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मुंबईतील चैत्यभूमीवर गेल्या होत्या. नंतर तेथेच दादासाहेब गायकवाड यांच्या आवाहनानुसार धम्माचा स्वीकार केला. 1964 साली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमीहिनांच्या सत्याग्रहात सर्व जाती धर्माच्या भूमिहीनांनी सहभाग घेतला होता. या सत्याग्रहात नाजाबाई सोनवणे यांच्यासह गिताबाई गायकवाड, शांताबाई दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली वस्तीमधील महिलांमध्ये जागृती निर्माण केली. शेकडो महिला सत्याग्रहात सामील झाल्या होत्या. पोलिसांच्या बंदीला झुगारूले म्हणून नाशिकरोड कोर्टाने त्यांना दोन महिन्याची कैदही सुनावली होती. त्या काळात नाजाबाई यांनी दोन वेळा दिल्ली वारी देखील केली होती.