नाशिक -कोरोनाविषयी संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापित केलेल्या प्रयोगशाळांनी सूचित केल्यानुसार डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. हा विषाणू घातक आहे. याबाबत केंद्रानेही राज्याला पत्र पाठवून सर्तकता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संभाव्य धोका लक्षात घेता बेडसह, ऑक्सिजन सुविधा आणि औषधसाठा करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदी यंत्रणांना निर्देश दिले आहे. अशातच दुसर्या लाटेतील रूग्णसंख्या कमी होत असली तरी, डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत गाफील राहू नका असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिले. स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
व्यवस्थापन आराखडा तयार करा -
राज्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेबाबत बोलताना कुंटे म्हणाले, राज्य टास्क फोर्सच्या संकेतानुसार राज्यात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी आरोग्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या वाढवितानाच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे. प्रामुख्याने दुसर्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासली. अशी स्थिती उद्भवू नये यासाठी ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कुंटे यांनी सांगितले.
आतापर्यंत 7 लाख लसीकरण -
लसीकरणाबाबत बोलताना कुंटे म्हणाले, राज्यांना केंद्राकडून लस पुरवठा केला जातो. केंद्राने डिसेंबरपर्यंंत कशा पध्दतीने लस दिली जाणार याचे नियोजन दिले आहे. जुलै महिन्यात सव्वा कोटी डोस प्राप्त होणार आहेत. आम्ही प्रती दिन १० लाख लोकांच्या लसीकरणाची तयारी ठेवली आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार ७ लाखांपर्यंतचा टप्पा आपण गाठला आहे. आजही देशात महाराष्ट्र लसीकरणात पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी कुंटे सांगितले.