नाशिक- सौंदर्यनगरी म्हणून ओळख असलेले इगतपुरी शहर आता एका वेगळ्याच कारणावरून दहशतीखाली आला आहे. येथील नागरिक, शाळेत जाणारी मुले अगदी जीव मुठीत धरून वावरत आहेत. कारण इगतपुरी शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.
इगतपुरीत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ
शहरातील विविध ठिकाणी भटकी कुत्री अगदी मोकाटपणे वावरत आहेत. कोणी या कुत्र्यांना इथून हकलण्याचा प्रयत्न जर केला तर हे कुत्रे अंगावर धावून जातात आणि लचके तोडतात. त्यामुळे शहरातील सर्वच नागरिक दहशतीखाली आहेत. मात्र, यावर प्रशासन ठोस कारवाई करत नाही. अनेकवेळा शाळकरी मुलांना ही कुत्री चावा घेतात, त्यांच्या मागे लागतात. यामुळे शाळकरी मुलांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - सिन्नर येथील एटीएम फोडणाऱ्या ५ संशयितांना ११ तासांत अटक
इगतपुरी शहर हे नाशिक-मुंबई महामार्गच्या लगत आहे. शहराच्या जवळच कसारा घाट आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची रेलचेल असते. याच वाहनांतून शहरातून काही भटकी कुत्री आणून या ठिकाणी सोडली जातात आणि तीच कुत्री नंतर वस्तीकडे धाव घेतात. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील दोन महिन्यात तब्बल 107 नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकही धास्तावले आहेत.
हेही वाचा - नाशकात दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने पळविळे तब्बल तीन लाखाचे दागिने
त्यामुळे आता प्रशासनाने ही कुत्र्यांची वाढती संख्या बघता लवकरच खबरदारीच पाऊल उचलावीत आणि बंदोबस्त करावा, अशी मागणी इगतपुरीवासीय करत आहेत. तसेच बाहेरून आणून जे कुत्रे शहरात सोडतात त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.