नाशिक -कोरोना काळात उटण्याने अभ्यंगस्नान करणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मतं नाशिकचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ विक्रांत जाधव यांनी व्यक्त केलं आहे. दिवाळी निमित्त आयुर्वेदाचार्य डॉ. विक्रांत जाधव यांच्याशी ईटीव्ही भारत'ने केलेली खास बातचीत...
भारतातील प्रत्येक सणाला एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सणाला जोडून काही रूढी परंपरा आहेत. अशीच एक परंपरा म्हणजे दिवाळीत उटणे लावणे. दिवाळीत उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याला महत्व आहे. सुरवातीच्या काळात वनौषधींपासून बनवलेले उटणे दिवाळीत वापरले जातं असे. तसेच दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे. उटणे हे रजोगुणी, तेजोमय असल्याने ते अंगाला लावण्याची परंपरा आहे.
आध्यात्मिक दृष्टीकोनातून -
दिवाळी पर्वात ब्रह्मांडात तेज, आप आणि वायूयुक्त चैतन्यप्रवाहांचे भूतलावर येण्याचे प्रमाण जास्त असल्याने वायूमंडलात देवत्वाचे प्रमाणही जास्त असते. या देवत्वरूपी चैतन्यकणांचे त्या-त्या घटकांतून ग्रहण होऊन त्याचा त्याला चैतन्य फलप्राप्तीच्या दृष्टीने अधिक लाभ व्हावा, यासाठी या काळात तेज, आप आणि वायूवर्धक उटणे अंगाला लावून देहाची चैतन्य ग्रहण करण्यातील संवेदनशीलता वाढवली जाते. हा कालावधी उटण्याच्या वापरास पोषक आहे.
उटण्याचे आयुर्वेदिक महत्व-
विविध नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले उटणे हे एकप्रकारचे स्क्रबर असल्याचेच म्हणावे लागेल. हे उटणे थंडीतील चार महिने लावल्यास चेहऱ्याची त्वचा मुलायम होते. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी, यासाठी उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. ती मुलायम होण्यास सुरुवात होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.