महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चणकापूर, पुनद प्रकल्पातून पाणी सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; कसमादे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा - Collector Suraj Mandhare

जिल्हाधिकाऱ्यांनी शिल्लक पाणीसाठ्याचा आढावा घेऊन चणकापूर आणि पुनद प्रकल्पातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुनद व गिरणा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कसमादे पट्ट्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

Punand Dam
पुनद नदी

By

Published : Apr 14, 2020, 2:30 PM IST

नाशिक - कळवण तालुक्यातील चणकापूर आणि पुनद प्रकल्पातून पाणी सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मालेगाव पाटबंधारे विभागाने बुधवारी (15 एप्रिल) पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. या निर्णयामुळे कसमादे पट्ट्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

चणकापूर आणि पुनद धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे निदर्शनास आणून देत या दोन्ही प्रकल्पातून गिरणा आणि पुनद नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी आमदार नितीन पवार, आमदार डॉ.राहुल आहेर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदार आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिल्लक पाणीसाठ्याचा आढावा घेऊन चणकापूर आणि पुनंद प्रकल्पातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुनद व गिरणा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कालव्याद्वारेही पाणी सोडण्यात येणार आहे.

पाणी आर्वतनाच्या माध्यमातून गिरणा व पुनद नदीपात्रात 15 दिवसाचे आवर्तन राहणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गिरणा आणि पुनद नदीचे पात्र कोरडेठाक झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या कसमादे पट्ट्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कसमादे पट्ट्यातील शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपला मोर्चा गावाकडे वळवला. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली आहे.

कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसह कसमादे पट्ट्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कळवण तालुक्यातील संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details