नाशिक- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यासोबत ग्रामीण रुग्णायातील बेडची संख्या वाढवण्याचे तसेच ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर पुरवठ्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांसह ट्रस्ट रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल आणि ट्रस्ट हॉस्पिटलही ताब्यात घेणार
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल (गुरुवार) नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्वतः जिल्हारुग्णालयातील वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली .याशिवाय रुग्णालयातील सोयी सुविधा आणि सेवांविषयी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा रुग्णालयात लवकरच अतिरिक्त १०० बेड उपलब्द करून दिले जातील ,जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या बघता जिल्ह्यातील खासगी रुग्णालये आणि ट्रस्ट रुग्णालयेही ताब्यात घेतले जातील, अशी माहिती मांढरे यांनी दिली आहे.
नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा उद्रेक
नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. मात्र, नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावर उतरल्याने प्रशासनातील इतर अधिकारी अधिक सक्रिय झाले आहे. कोरोनाचा झालेला उद्रेक रोखण्याचे मोठे आव्हान शासकिय यंत्रणांसमोर उभे आहे. मात्र, नागरिकांनी आता तरी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
हेही वाचा -पुण्यात रात्रीची संचारबंदी; जाणून घ्या काय बंद, काय सुरू