नाशिक- लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून यंत्रमागाची खडखड थांबली होती. त्यामुळे यंत्रमाग कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. यासाठी शासनाने प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी देखील काही अटी व शर्तीच्या अधिन राहून शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी दिली. त्याअनुषंगाने शहरातील काही यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.
यंत्रमागाचा खडखडाट व कामगारांचा रोजगार अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी कामगारांसह यंत्रमाग चालक व मालकांवर मोठी जबाबदारी आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याची काळजी घेत यंत्रमाग कामगारांना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. आता सुरू करण्यात आलेले यंत्रमाग सुरळीतपणे सुरू राहावे त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील, राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
शहरातील यंत्रमाग सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी व त्यांचे सनियंत्रण करण्यासाठी स्थानिक स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती यंत्रमाग कामगार व कारखानदार यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्यक्त केला.