नाशिक - देशभरात कोरोना विषाणूचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा विषाणू हा रुग्णांच्या रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. यासाठी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आर्सेनिक अल्बम-३० या होमियोपॅथिक औषधाचे वाटप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड आणि उपाध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या औषधांचे वाटप करण्यात आले.
ट्रान्सपोर्ट व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कोरोनाच्या कालावधीत चालक तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करणारे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहे. त्या दृष्टीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीत ट्रक चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणाऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये ट्रकचालकांना अन्नधान्य तसेच प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजारात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आर्सेनिक अल्बम-३० या होमियोपॅथिक औषधाच्या १ हजार बाटल्याचे वाटप करण्यात आले.