नाशिक - पाणीपुरी म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सूटते. मात्र, शहरात याबाबत एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ते बघून पाणीपुरी खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा विचार कराल.
नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड नाशिकच्या सातपूर परिसरातील बजरंग नगर परिसरात अत्यंत गलिच्छ पद्धतीने पाणीपुरी बनवल्या जात होती. सडलेले बटाटे, रंग मिश्रित चटणी, खराब तेल, दुर्गंधीयुक्त हरबरे आणि उघड्यावर पडलेल्या पुऱ्या यातून हा पदार्थ विक्रेता बनवत होता. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता अभियानाअंतर्गत पाहणी दौरा सुरू असताना हा किळसवाणा प्रकार आढळून आला.
हेही वाचा - शिरूरची झिरो एनर्जी शाळा म्हणजे चमत्कार, छत्तीसगडचे शिक्षकही झाले आवाक
मूळचा मध्य प्रदेशचा असलेल्या दिवान सिंग हा अशाप्रकारची पाणीपुरी विकत होता. त्याच्या घरातून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सगळे गलिच्छ साहित्य जप्त करून नष्ट केले. शिवाय प्लास्टिकचा वापर आणि पाणीपुरीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याप्रकरणी दिवान सिंगला ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
हेही वाचा - ' मी पंढरपूरला दर्शनाला जातो.. पण त्याचे राजकारण करत नाही'
पाणीपुरी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. मात्र, पाणीपुरीच्या नावाखाली जर अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल, तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. अशा घाणेरड्या पद्धतीने पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया आता जनमाणसातून उमटत आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना अन्न व औषध प्रशासन झोपा काढतय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.