नाशिक - महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी देवी ओळखली जाते. अठरा हातांच्या या मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येत असतात. तसेच नवरात्र उत्सव काळात पाच लाखांहून अधिक भाविक मातेच्या पायाशी नतमस्तक होत असतात.
नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर वणी येथील गडावर साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखली जाणारी सप्तशृंगी देवी विराजमान आहे. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे मंदिर पुरातन असून समुद्रसपाटीपासून 4,569 फूट उंचीवर आहे. मंदिरावर जाण्यासाठी नांदूर गावपासून पायी रस्ता आहे. तसेच पायऱ्या सोबत आधुनिक फेनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून काही मिनिटात भाविक थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. या भागात माकडांची मोठी वस्ती आहे. सप्तशृंगी गडाच्या बाजूला शिवतीर्थ शितकडा गणपती मंदिर गुरुदेव आश्रम सूर्यकुंड कालिका कुंड जलगुफा आदी ठिकाणे आहेत.
हेही वाचा-तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव यंदाही भक्तांविनाच; भाविकांना प्रवेश बंदी
अशी आहे आख्यायिका-
दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखल सापडतो. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केल्याचेही म्हटले जाते. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजीताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडले होते. तेव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत नेला. त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच सप्तशृंगी गड म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे अनेक पौराणिक उल्लेख सापडतात. तसेच सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनासाठी आल्याचे इतिहासात संदर्भ आढळतो.