महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येऊ नये, पोलिसांचे आवाहन - Trimbakeshwar temple police appeal

श्रावण महिना सुरू होत असल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळ बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला येऊ नये, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Trimbakeshwar temple visit ban
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन बंदी

By

Published : Aug 8, 2021, 10:05 PM IST

नाशिक - श्रावण महिना सुरू होत असल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, काेरोनाच्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळ बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला येऊ नये, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. तसेच, खबरदारी म्हणून चार ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

माहिती देताना मंदिराचे पुजारी

हेही वाचा -खासगी क्लासेसला उद्योगाचा दर्जा द्यावा, अन्यथा.. प्रा. बंडोपंत भुयार यांचा इशारा

12 पोलीस अधिकारी व सुमारे 90 कर्मचारी तैनात राहणार

श्रावण महिन्यात विशेष महत्व असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकराजाचे मंदिर देखील यंदा बंद असणार आहे. तर, याच कालावधीत दर सोमवारी होणारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा देखील भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. श्रावणी सोमवारनिमित्त भाविक शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. मात्र, कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता येत नाही. तरीदेखील काही भाविक त्र्यंबकेश्वरला येऊ शकतात, अशी शक्यता गृहीत धरून ग्रामीण पोलिसांकडून पहिने, पेगलवाडी, गोरखनाथ व सापगाव या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या ठिकाणी 12 पोलीस अधिकारी व सुमारे 90 कर्मचारी तैनात राहणार आहेत. प्रत्येक श्रावणी सोमवारनिमित्त, तसेच शनिवारी व रविवारी हा बंदोबस्त तैनात राहणार आहे. नागरिकांसह भाविकांनी मंदिर दर्शन, कळस दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. श्रावणमास सुरू होत असल्यामुळे त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी घेतला आहे.

श्रावण मासात होणारी त्रिकाल पूजा ही मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते होणार

श्रावण महिन्यात शेकडो भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होऊन ब्राम्हगिरी प्रदक्षिणा करत असतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा प्रदक्षिणा बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मंदिर बंद जरी असले, तरी मात्र श्रावण मासात होणारी त्रिकाल पूजा ही मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. त्यात खंड पडू दिला जाणार नाही. उद्या सायंकाळी भगवान त्र्यंबकराजांच्या पादुकांना कुशावर्तमध्ये स्नान घालून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होईल. गेल्या काही दिवसांपासून मंदिर पूर्णपणे भाविकांसाठी बंद आहे. मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही, बाहेरूनच अनेक भाविक दर्शन घेऊन माघारी फिरत आहेत. मात्र आता भाविकांना येण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्र्यंबकेश्वर येथील रस्त्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावरही मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या कुठल्याही व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी लसीकरण हाच शाश्वत पर्याय - छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details