त्र्यंबकेश्वर मंदिरात वाद नाशिक :त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी रात्री संदल मिरवणुकीदरम्यान दुसऱ्या धर्माच्या काही व्यक्तींना हिंदू धर्माचे पवित्र स्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात प्रवेश करण्याचा आग्रह केला. मंदिरातील पुरोहितांनी मात्र त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात दंगलीचा कट असल्याचा संशय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला होता.
कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पण लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
त्र्यंबकेश्वरमध्ये शांतता आहे. कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही अडचण नाही. आम्ही नियम आणि नियमांनुसार तपास करू आणि त्या आधारावर पुढील कारवाई करू. त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक पुढील तपास करतील - बीजी शेखर, आयजी नाशिक
गृहमंत्री एसआयटी नेमणार :त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याची सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या नाही तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करणार आहे, अशा प्रकारचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
कठोर कारवाई करावी :या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी केली आहे.
दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करून शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी हे प्रकरण घडवले जात आहे - महंत अनिकेत शास्त्री देशपांडे
त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याची प्रथा : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थानांपैकी एक आहे. मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनानुसार, गैर - हिंदूंना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही. शहरातील दर्ग्यात दरवर्षी संदल मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक जेव्हा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ येते तेव्हा सेवेकरी दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यादिवशी सुद्धा आम्ही देवाला धूप दाखवण्यासाठीच आलो होते, आमचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न नव्हता, असे दुसऱ्या गटाने आपल्या बचावात सांगितले आहे.
हेही वाचा
- Trimbakeshwar Temple closed : त्र्यंबकेश्वर मंदिर जानेवारी महिन्यातील 'या' तारखेपर्यंत राहणार बंद
- Nashik Trimbakeshwar Temple: मंदिरातील पिंडीवर बर्फ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अंनिसने आवाहन
- Sri Kshetra Trimbakeshwar : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी; चला तर मग आपणही घेऊया दर्शन...