नाशिक- शहरामध्ये आज(सोमवार) सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील धुक्याची चादर पसरल्याने आता थंडीची चाहूल लागली आहे. धुक्यातून वाट काढत अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते. तर काही नागरिक सकाळच्या उत्साही वातावरणात व्यायाम करत होते. गोदावरी नदीवरही धुक्याची चादर पसरली होती. नदीचे विहंगम दृष्य नागरिक डोळ्यात साठवत होते. तर काही जण छायाचित्र काढण्यात दंग होते.
नाशिकवर पसरली धुक्याची चादर; गुलाबी थंडीची चाहूल
शहरामध्ये आज(सोमवार) सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील धुक्याची चादर पसरल्याने आता थंडीची चाहूल लागली आहे.
ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात थैमान घातल्याने यंदा मात्र थंडी महिना भर उशिराने सुरू झाली आहे. आज सकाळी गोदावरी नदीत काही तरुण नौका विहार करत होते. दाट धुक्यामध्ये नौका विहार करणाऱ्या तरुणांना पाहून हा नजारा काश्मीरमधील तर नाही ना? असा भास काही क्षण होत होता.
यंदा थंडी उशिराने सुरू झाली असली तरी, नाशिक, पुणेसह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान ५ अंशपर्यंत खाली जाऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळेच यंदा कमी दिवस का होईना मात्र, गुलाबी थंडीचा आनंद सर्वांना घेता येणार आहे.