नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता पावसाळ्यात किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसात पालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यूचे 177 तर चिकनगुनियाचे 175 रुग्ण आढळले आहेत. शहरात खाजगी रुग्णालये तसेच खाजगी लॅबकडून निदान झालेले अहवाल पालिकेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने खासगी लॅबला डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या बाधित रुग्णांचा अहवाल पाठविण्याची सक्ती करण्यात आली. त्या पद्धतीने करावी अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.
सातपूर आणि भगूर भागात सर्वाधिक रुग्ण
सातपूर विभागामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदी आजारांच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार विभागातील रुग्ण संख्या 100 हुन अधिक असून त्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच भगूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनिया सारख्या आजाराचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून 'आरोग्यम् धनसंपदा अभियान' राबविण्यात आले. यामध्ये 150 हुन अधिक नागरिकांनी सहभाग नोदंविला. येथील प्रेरणा बलकवडे यांनी झेप भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून बलकवडे कोविड सेंटरच्या प्रांगणात या उपक्रमाचे आयोजन आयोजन केले होते. यामध्ये गंगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने डॉ.भूषण देशमुख यांसह नितीन पुलेकर यांनी नागरिकांची हाडांची तपासणी व उपचार केले.
नागरिकांनी तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार करावेत - बलकवडे