नाशिक- राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने घेतले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांसोबत कोचिंग क्लासही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दहावी आणि बारावीचे वर्ग घेण्यास परवानगी मिळावी यासाठी क्लास संचालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सोशल डिस्टन्स, अटी पाळू, पण क्लास सुरू करु द्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे अडचणीवाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार खबरदारीचे उपाय घेताना जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस हे बंद राहणार आहेत. या निर्णयानंतर कोचिंग क्लास संचालकांच्या संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात की विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे काही अडचणी उभ्या राहिल्या आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी कोचिंग क्लासेसची मदत होते. पालकांच्या सहमतीने १५ ते २० विद्यार्थ्यांना घेऊन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस सुरू व्हावेतगेल्या वर्षभरापासून कोचिंग क्लासेस बंद होते. दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. कोरोना नियमांचे पालन करून सर्व क्लासेस सुरू होते. परंतु, आता शाळा- कॉलेजबरोबर क्लासेसही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु शाळा-कॉलेजमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग पालकांच्या सहमतीने घेण्यास परवानगी दिली आहे. तशीच परवानगी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस सुरू करण्यासाठी देण्यात यावी, अशी मागणी क्लास संचालक संघटनेचे अध्यक्ष जयवंत मुळे यांनी जिल्हाधिकारींकडे केली आहे.