नाशिक- गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मराठा समाज आणि संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.
गुणरत्न सदावर्ते यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्वच स्तरातून सदावर्ते यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. याचेच पडसाद गुरुवारी नाशिक शहरामध्ये देखील बघायला मिळाले. नाशिकमधील विविध मराठा संघटनांनी सकल मराठा समाजाच्या वतीने आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे तक्रात दाखल करण्यात आली. नियमांचे पालन करून मराठा समाज आपला आरक्षणासाठीचा संघर्ष करत असताना सदावर्ते अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत यावेळी मराठा बांधवांनी व्यक्त केले.