नाशिक - कोरोना पाॅझिटिव्हिटी दरात देशात पहिला अशी नामुष्की ओढावलेल्या नाशिकमध्ये लाॅकडाऊनचे सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहे. मागील २२ दिवसात कोरोना पाॅझिटिव्ह होण्याचा दर २३.७१ टक्क्यांवरुन १०.४४ टक्के इतका खाली घसरला आहे. परिणामी रुग्णवाढीचा आलेख खालावला असून दिवसाला एक हजाराच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे.
नाशिक: पाॅझिटिव्ह रुग्ण दर १०.४४ टक्क्यांनी खाली घसरला
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार ६९७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १५ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोना लागण होण्याचे प्रमाण घटले
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सर्वाधिक कहर ज्या जिल्ह्यांमध्ये झाला त्यात नाशिक जिल्हा आघाडीवर होता. दिवसाला पाच ते सहा हजार इतके कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. एका अहवालनूसार देशात अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देशात सर्व मोठ्या शहरांना मागे टाकत नाशिक पहिल्यास्थानी पोहचले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मे महिन्याच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह रेट हा तब्बल २३.७१ टक्के इतका होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. बेड, आँक्सिजन, रेमडेसिवीर याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, राज्य शासनाने 'ब्रेक दी चेन' अंतर्गत कडक निर्बंध जारी केले. तसेच जिल्हा प्रशासनानेही हा पाॅझिटिव्ह रेट कमी करण्यासाठी युध्दपातळीवर हालचाली करत स्थानिक पातळीवर १२ ते २३ मे, असा कडक लाॅकडाऊन जाहीर केला. नाशिककरांनीही त्यास सहकार्य करत नियमांचे पालन केले. त्या सर्वांची परिणीती म्हणजे पाॅझिटिव्हिटिचा आलेख खालावत असल्याचे पहायला मिळते. मागील २२ दिवसात २३.७१ टक्क्यांवरुन हा दर १०.४४ टक्क्यांवर आला आहे. म्हणजे १३.२७ टक्क्यांनी कोरोना लागण होण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामी अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ हजारांहून कमी होत ती १६ हजारांपर्यंत खाली आहे. एकूणच कोरोना लढ्यातले हे मोठे यश असून निर्बंधाचे पालन केल्यास पाॅझिटिव्हिटी दर आणखी खाली येण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात १५ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार ६९७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १५ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे....
पाॅझिटिव्ह दराचा खालावलेला आलेख
२ मे ते ८ मे
टेस्ट - १५४३०
पाॅझिटिव्ह - ३६७७
मृत्यू - ४१
डिस्चार्ज - ४३२८
अँक्टिव्ह रुग्ण - ३४ हजार ६८१
पाॅझिटिव्हिटी रेट - २३.७१
९ मे ते १५ मे
टेस्ट - १३३६२
पाॅझिटिव्ह - २२०१
मृत्यू - ३५
डिस्चार्ज - ४१८२
अँक्टिव्ह रुग्ण - २५ हजार ७७२
पाॅझिटिव्हिटी रेट - १७.५०
१६ मे ते २२ मे
टेस्ट - १४१०९
पाॅझिटिव्ह - १४४१
मृत्यू - ३८
डिस्चार्ज - १८४०
अँक्टिव्ह रुग्ण - १७ हजार ६०५
पाॅझिटिव्हिटी रेट - १०.४४