नाशिक :रुग्णाचा इसीजी केल्यानंतर कागदावरील सरळ रेषा म्हणजे रुग्णाच्या हृदयाची धडधड बंद झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय दृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. गुरुवारी नाशिक जिल्हा रुग्णालयातील इसीजी रिपोर्टवरून मृत ठरवलेला रुग्णवर आणि नातेवाईकांवर अशीच वेळ आली होती. मात्र, काही वेळानंतर रुग्ण जिवंत असल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.
इसीजी रिपोर्ट फ्लॅट :सोमवार दिनांक 22 मे रोजी नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरातील एका व्यावसायिकाने स्वतःला पेटून घेतल्याची घटना घडली होती. यात तो 93 टक्के भाजला होता. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी सहा वाजेच्या सुमारास रुग्णाची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे वार्डमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी डॉक्टरने वैद्यकीय तपासणी केली. रुग्णाचा इसीजी रिपोर्ट फ्लॅट असल्याने डाॅक्टरांनी नातेवाईकांना रुग्णाचे निधन झाल्याचे सांगितले. यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.