नाशिक :येथील पोलीस अकादमीमधील 122 व्या पोलीस उपनिरीक्षक तुकडीतील 494 प्रशिक्षणार्थी आज पोलीस सेवेत दाखल झाले. यात महिला पोलीस उपनिरीक्षकांची संख्या जास्त आहे. नाशिक पोलीस अकादमीमध्ये झालेल्या कार्यक्रमप्रसंगी, पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी शिस्तबद्ध संचलन केले. यावेळी पोलीस दलात दाखल होताना सर्व पोलीस उपनिरीक्षकांनी शपथ घेतली. यावेळी उत्कृष्ट पोलीस उपनिरीक्षकांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट पोलीस उपनिरीक्षक :यात किरण देवरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर बेस्ट कँडेडेटट लॉक, बेस्ट ड्रिल रुबिया मुलानी बेस्ट रायफल आणि रिव्हॉल्वर (नेमबाजी) प्रशांत बोरसे, अभ्यासात परिपूर्ण (सिल्व्हर बॅटन) किरण सुभाष देवरे, ऑल राउंडर वूमन रेणुका परदेशी, यशवंतराव चव्हाण पुरस्कार (ऑल राउंडर पुरुष) अभिजित काळे यांना तर सेकंड बेस्ट कॅडेट (दुसरे ऑल राउंडर) किरण देवरे आणि मानाचा समजला जाणारा बेस्ट कॅडेट पुरस्कार अभिजीत काळे यांना देण्यात आला.
पोलीस दलाचा नावलौकिक :महाराष्ट्र पोलीस दल प्रशिक्षित, शिस्तबद्ध पोलीस दल आहे. देशात आपल्या पोलीस दलाचा नावलौकिक आहे. आम्ही नवीन प्रशिक्षण पोलिसांना देत आहे. नवीन आव्हाने स्वीकारण्याकरिता आता पोलीस दल सज्ज आहे. नवीन सायबर प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. सायबर गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न आमचा प्रयत्न आहे. मागील तीन वर्षात भरती होऊ शकलेली नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे तरी अभ्यास करून बोलतील :किमान आदित्य ठाकरे तरी अभ्यास करून बोलतील असे वाटत होते, परंतु त्यांनी डोळ्याला पट्टी लावली आहे. त्यांना उत्तर देऊन फायदा काय, असे फडणवीस म्हणाले आहेत. औरंगजेब संदर्भात मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुन्हा कुणाला जबाब देण्याची गरज नाही. सेवा निवृत्तीनंतर काही पोलीस दलातील अधिकाऱ्यांना राजकारणात येवून सेवा करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.