निफाड (नाशिक) : अवकाळी पावसामुळं द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झाला आहे. निफाड तालुक्यातील कसबे, सुकेणेमध्ये आज माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. गारपीटीनं निफाड तालुक्यातील कसबे, सुकेणे इथं द्राक्ष, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज निफाडमध्ये आले होते. या परिसरत द्राक्ष बागांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभे राहणं गरजेचं असल्याचं थोरात यांनी म्हटलंय. विधानसभेच्या अधिवेशनात देखील याबाबत आम्ही चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाची वाट पाहून नये, त्याआगोदर त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहावं असं थोरात यांनी म्हटलंय.
कोट्यवधी रुपयांचं नुकसान :गारपीट, वादळामुळं मोठ्या प्रमाणात कांदा पिकांचं नुकसान झालं आहे. जवळपास वीस ते पंचवीस टक्के लाल कांदा देखील खराब झाला आहे. 500 ते 600 कोटी रुपयांचं कांद्याचं नुकसान झाल्याची माहिती आहे. तसंच तीस हजार एकरावरील द्राक्ष बाग देखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत, असून कांदा तसंच द्राक्ष बागेच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.