नाशिक - ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करता करता यावे, यासोबतच नाशिकच्या कृषी पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने नाशिक पर्यटन आणि कृषी विभागाच्यावतीने ( Nashik Tourism And Agriculture Department ) गंगापूर धरणाजवळील ग्रेप रिसॉर्टमध्ये ( Nashik Grape Resort ) शनिवारपासून दोन दिवसीय द्राक्ष महोत्सवाचे ( Nashik Grapes Festival ) आयोजन करण्यात आले आहे. द्राक्षांच्या तब्बल ५३ प्रजाती इथे उपलब्ध करण्यात आल्या असून वाईनचीदेखील ( Nashik Wine ) चव पर्यटकांना चाखता येते आहे. यासोबतच विविध वस्तूंचे प्रदर्शनही इथे भरविण्यात आले आहे. या महोत्सवाला नागरिकांचादेखील उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांशी साधला कृषीमंत्र्यानी संवाद -राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ( Dada Bhuse ) या द्राक्ष महोत्सवास भेट दिली. यावेळी द्राक्षांच्या विविध वाणांची पाहणी करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी कृषीमंत्री यांनी संवाद साधला. द्राक्षांच्या विविध उत्कृष्ट वाणांचे उत्पादन करणाऱ्या ३५ शेतकरी व उत्पादकांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.