नाशिक- वेगाने वाढणाऱ्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील इंडिया सिक्युरिटी तसेच करन्सी नोट प्रेस 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील 17 दिवस प्रेसमधील कामकाज ठप्प राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज हजारो रुग्ण कोरोनाबाधित आहेत. तर 25 ते 30 जणांचा मृत्यू होत आहे. नोट प्रेसमधील अनेक कामगार बाधित होत आहेत. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याच्या काळजीपोटी इंडिया सिक्युरिटी तसेच करन्सी नोट प्रेस या दोन्ही प्रेस बंद ठेवण्याची मागणी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दोन्ही प्रेसच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. दोन्ही प्रेसमध्ये शहर तसेच ग्रामीण भागातील कामगार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून (शुक्रवार) 30 एप्रिलपर्यंत प्रेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 1 मे महाराष्ट्र दिन व 2 मे रविवार यामुळे पुढील 17 दिवस प्रेसमधील कामकाज ठप्प राहणार आहे. परंतू तातडीचे काम असल्यास कामगारांना हजर राहावे लागेल, अशी पूर्वकल्पनाही अधिकारी आणि कामगारांना देण्यात आली आहे