नाशिक -महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर भरती प्रक्रिया रावबली. मात्र, या भरती दरम्यान झालेल्या गर्दीमुळे महानगरपालिकेलाच कोरोनाचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरात आढळून येत असल्याने महानगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. 3 महिन्याच्या कालावधीसाठी मानधनावर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया महानगरपालिकेच्या मुख्य इमारत असलेल्या राजीव गांधी भवन येथे पार पडत आहे. मात्र, या भरती प्रक्रियेदरम्यान इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने भरती प्रक्रिया दरम्यान फज्जा उडाला. यावेळी महानगरपालिकेच्या पार्किंग भागात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. एकीकडे महानगरपालिका गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर कारवाई करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या कार्यालयातच झालेली गर्दी बघून नागरिकांना प्रश्न पडला आहे.