नाशिक- येवला तालुक्यात गुरुवारी सायंकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र, या पावसामुळे रेंडाळे आणि अंदरसूल गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे.
अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. येवल्यातील पूर्व भागात सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीमध्ये पाणी साचले. रेंडाळे गावातील शेतकऱ्याच्या बाजरीच्या शेतात दोन फुटांपर्यंत पावसाचे पाणी साचले तर अंदरसूल गावातील शेतकरी झुंजारराव देशमुख यांच्याकडील 2 एकर मका जमीनदोस्त झाली. रात्रभर संततधार चालू असल्याने अनेक ठिकाणचे बंधारे भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील डोंगरदऱ्यातून पावसाचे पाणी खळखळ वाहत असल्याचे नयनरम्य दृश्य सध्या बघण्यास मिळत आहे. काही परिसरात शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप लावले होते. मात्र, रात्रभर झालेल्या पावसामुळे कांद्याच्या रोपांच्या वाफेत पूर्णपणे पाणी साचल्याने आता रोपे खराब झाली आहे.