नाशिक -जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे तब्बल 6 हजार 89 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात 4 हजार 93 हेक्टरवरील बागायची तर 1 हजार 942 हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा -दादा भुसे
या अवकाळीने बागलाण तालुक्यातील 15 गावांमध्ये 2 हजार 728 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये गहू, कांदा, हरभरा इत्यादी पिकांचा समावेश आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील 282 गावातील दहा हजार 170 शेतकऱ्यांची कांदा, द्राक्षे, गहू, मका, ऊस, पेरू, डाळिंब, हरभरा, सीताफळ ही शेतात उभी असलेली पिके अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आडवी झाली. विशेष म्हणजे, उन्हाळा कांद्याच्या पिकासह कांद्याची रोपे ही पूर्णपणे नष्ट झाली आहे. अनेक काढणीला आलेला हरभर, गहू यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. तर द्राक्षबागा आडव्या झाल्या आहेत.