नाशिक - कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे मका पीक भुई सपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानाचे शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कळवण तहसीलदारांना शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी निवेदन देखील देण्यात आले आहे.
कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. या पावसामुळे कळवण तालुक्यातील ओतूर, मानूर पाळे यासह तालुक्यातील सुमारे 30 ते 40 गावांमध्ये पावसामुळे मका पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावे आणि पीक विमा कंपनीच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच तारखेच्या आधी बंद पडलेल्या ऑनलाईन संकेतस्थळामुळे पीकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.