नाशिक -जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आठवड्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमार्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात दिवाळीच्या काळात अवघ्या 110 रुग्णसंख्येपर्यंत पोहोचलेला आकडा नोव्हेंबर अखेरपासून डिसेंबरच्या प्रारंभीच्या आठवड्यात सातत्याने 300 ते 400पर्यंत पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागणी सांगितले आहे.
का वाढतेयरुग्णसंख्या?
दिवाळीपर्यंत बाधितांचा आकडा खूप खाली आला होता. नागरिकदेखील शासन नियमांचे पालन करत असल्याचे चित्र होते. मात्र दिवाळीच्या काळात बाजारात झालेली गर्दी आणि नागरिकांना सामाजिक अंतराचा विसर पडल्याच्या परिणामामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असल्यास नागरिकांनी मास्क, वारंवार हाथ धुणे आणि सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे.
नाशिक जिल्ह्यातील 'या' भागात वाढतोय प्रादुर्भाव
नाशिक शहरासह निफाड आणि सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर काही आदिवासी तालुक्यांची वाटचाल शून्याकडे सुरू आहे. त्यामुळे एकीकडे वाढीचे चित्र दिसत असले तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक परिणाम दिसून येत आहे.